Popular Posts

Sunday, February 2, 2014

अन्ग्रीया बँक प्रवाळ बेटांच्या निमित्ताने

(The article was published by Chanakya Mandal Pariwar in their January issue)

डिसेंबर महिन्यत“राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने” (National Institute of Oceanography) विजयदुर्ग पासून १०० की.मी. पश्चिमेला असणाऱ्या अन्ग्रीया बँक ह्या प्रवाळ बेटांचे संशोधन सुरु केल्यापासून पुन्हा एकदा अन्ग्रीया बँक हा विषय चर्चेत आला आहे.त्या निमित्ताने प्रवाळ म्हणजे काय, त्यांच्या जीवनाविषयी थोडी माहिती, त्यांचे उपयोग, त्यांना असणारा धोका आणि ह्या संशोधनाचं महत्वह्यांचा आढावा घेणारा हा लेख.

अन्ग्रीया बँक आणि तत्सम माहिती-


२५-३५ अंश सेल्सियस तापमानात वाढणाऱ्या प्रवाळांचे जीवशास्त्रीय आणि पर्यावरणीय दृष्ट्या खूप महत्त्व आहे. उथळ पाण्यात वाढणाऱ्या ह्या जीव प्रकारांमुळे अनेक मास्यांच्या प्रजाती आणि शैवाल टिकून राहतात. सूर्यकिरण थेट पोचत असल्यामुळे प्रवाळ बेटं म्हणजे एक मोठा उत्पादक भाग (biologically productive zone) तयार करतात. अन्ग्रीया बँक ही काही आज एकदम सापडलेली गोष्ट नाहीये. गेले काही दशकं झूलोजीकल सोसायटी ऑफ इंडिया आणि वन विभाग त्यावर संशोधन करत आहे. मात्र आता तेथील जैवविविधता आणि प्रजाती आणखी सखोल अभ्यासल्या जाऊन आपल्याला हिंद महासागरात असणाऱ्या ह्या खजिन्याची आणखी सखोल माहिती मिळू शकेल. अन्ग्रीया बँक विजयदुर्ग पासून १०५ की.मी. अंतरावर असून समुद्र पातळीपासून २० मी. खोल आहे. त्याचा उत्तर-दक्षिण विस्तार ४० की.मी. तर पूर्व पश्चिम १५ की.मी.आहे.अन्ग्रीया बँक हे प्रवाळ बेट साधारणतः ६-७ कोटी वर्षांच्या काळापासून तयार होत आले असावेत प्रवाळ आणि त्यांचे उपयोग पुढे दिलेलेच आहेत त्यानंतर आपल्याला ह्या संशोधनाचं महत्त्व आणखीठळकपणे लक्षात येईल.

Location of Angria Bank w.r.t. Vijaydurga


भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यावर प्रवाळ हे खूप कमी ठिकाणी आणि विखुरलेल्या भागातच आढळतात. वायव्येकडील कच्छचे आखात, अतिदक्षिणेकडील तटीयप्रदेश, लक्षद्वीपचा समुद्र, मंगलोर, पूर्व किनाऱ्यावर कुडालोरपासून पॉंडिचेरीपर्यंत मंडपमआणि रामेश्वरमच्या, मानारच्या आखातात आणि तुतिकोरीनपर्यंतकिनाऱ्याजवळ, लहान मोठी प्रवाळ खडकांची बेटे विखुरलेली आढळतात. अडस बँक, कोरा दिव्ह ही भारताच्या समुद्रातील आणखी काही विशेष उदाहरणे.

प्रवाळांविषयी थोडेसे-

प्रवाळ ह्या वर्गाबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज दिसून येतात. दिसायला रंगीत खड्कांसारखे वाटत असले तरी प्रवाळ हे अपृष्ठवंशीय सजीव प्राणी असून (invertebrate animals) Cnidaria (उच्चार- निडारिया) वर्गात मोडतात. त्याचं आयुष्य एखाद्या कठीण पृष्ठभागाला बांधून घेऊन तिथेच व्यतीत होतं. प्रवाळांचे अनेक उप-प्रकार आणि प्रजाती असल्या तरी त्याचं वर्गीकरण दोन मुख्य प्रकारात केलं जातं ते म्हणजे कठीण प्रवाळ आणि मृदू प्रवाळ- हार्ड आणि सॉफ्ट. आपण ज्या कोरल रीफ्स पाहतो त्या हार्ड कोरल्स नी बनवलेल्या असतात. त्यांचा बाह्य सांगाडा हा कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेला असतो जे त्यांना समुद्राच्या पाण्यातून मिळत. Reefs, Brain, Filkhorn हे हार्ड कोरल्स चे प्रकार आहेत तर Sea Fingers and Sea Wipes सॉफ्ट कोरल्स चे. सर्वच प्रवाळ हे रात्री आपले शोषक अंग बाहेर काढून Zooplanktons (उच्चार- झूप्लांक्टॉन) खातात शिवाय त्यांच्या शरीरावर चिकटलेले zooxanthellae (उच्चार- झूझान्थेली) त्यांना ऑक्सिजन आणि इतर मूलद्रव्यांचा पुरवठा करतात बदल्यात त्यांना कोरल्स संवरक्षण आणि राहण्यासाठी जागा पुरवतात.

Coral Polyp


आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रवाळांचा सुंदर रंग हा त्या Zooxanthallae च्या रंगद्रव्यानमुळेच आलेला असतो. Zooxanthallae आणि Corals मध्ये Symbiotic Living Relationship दिसून येते. आपल्याला दिसणारे रीफ्स म्हणजे प्रवालांचे अक्खे महानगर समजूयात, त्यातील छोटे छोटे खडक म्हणजे एक एक शहर आणि त्यातील एक कोरल्स म्हणजेऐसपैस बंगला! एका प्रवाळला Polip (उच्चार- पॉलीप) असे म्हणतात. त्यामध्ये त्याची पचनसंस्था आणि इतर अवयव राहतात. अंगावरील कठीण कवचामुळे त्यांना संरक्षण मिळते आणि एकत्र राहून ते मोठी रंग बनवतात ज्याला आपण कोरल रीफ्स किंवा बेटं म्हणतो. त्याचं प्रजनन हे बाह्य प्रजनन असत (External Fertilization) ज्यामध्ये मादी स्त्री-बीज समुद्राच्या पाण्यात सोडते तर नर आपले शुक्राणू मोठ्याप्रमाणावर समुद्राच्या पाण्यात सोडतात. त्याचं मिलन होवून नवीन कोरल्स तयार होण्याचे चक्र सुरु राहते. त्यांच्या वाढीसाठी उत्तम तापमान हे विषुववृत्तीय म्हणजे २०-३५ अंश सेल्सियस इतके असते.

प्रवाळांचे उपयोग-

१.       Biologically productive zone आणि उथळ भाग असल्यामुळे मत्स्य उत्पादनाला आणि त्यामुळे मासेमारीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळते
२.       तेथे आढळणाऱ्या अनेक जीवांपासून औषधी तत्त्व मिळवून त्यांचा वापर anti-bacterial आणि anti-biotic औषधं बनवण्यासाठी होवू शकतो.
३.       स्नोर्केलिंग आणि स्कुबा डाव्हिंग साठी लागणाऱ्या सोयी सुविधा निर्माण करून पर्यटनाला आणि रोजगार निर्मितीला चालना देता येऊ शकते.
४.       जगातील साधारण २५% मासेमारी ही कोरल्स मुळे टिकून आहे.
५.       वादळी आणि विनाशकारी लाटांचा वेग हा अश्या प्रवाळ बेटांच्यामुळे अडवला जाऊन किनाऱ्यावरच नुकसान कमी होतं.


प्रवाळांना असणारे धोके-

१.       कोरल ब्लिचिंग- वातावरणातील वाढणारं कार्बनच प्रमाण समुद्रात विरघळणाऱ्या कार्बनच प्रमाण सुद्धा वाढवते त्यामुळे समुद्राची आम्लता (acidity) वाढून zooxanthalle ना धोका उद्भवतो. त्या नष्ट झाल्या तर सुरवातीला प्रवाळ फिके पडणं आणि हळू हळू प्रवाळांची वाढ कमी होवून त्या मृतवत होणं सुरु होतं.
२.       मासेमारीसाठी डायनामाईट आणि सायनायीड सारख्या द्रव्यांचा वापर केल्यामुळे प्रवाळ मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात. काही ठिकाणी मासे मारून काही काळानंतर शिजवण्यापेक्षा सायनायीड वापरून त्यांना बेशुद्ध अवस्थेत पकडलं जातं. त्यासाठी सायनायीड च्या नळकांड्या प्रवाळांमध्ये फोडून त्याच्या संपर्कात येणाऱ्या मास्यांना बधीर केलं जातं आणि शिजवताना असे मासे जिवंतपणे शिजवले आणि वाढले जातात. त्यांच्या ताजेपाणासाठी त्यांना जास्त भाव मिळतो. मात्र ह्यांचा परिणाम अर्थातच प्रावाळांवर होतो.
३.       समुद्रात मोठ्याप्रमाणावर हानिकारक रसायने आणि शहरांचा कचरा प्रक्रिया न करता सोडल्यामुळे अनेक दुष्परिणाम दिसून येतात.
४.       औष्णिक विद्युत केंद्र समुद्रात गरम पाणी सोडतात तेव्हा सुद्धा कोरल्स फिके पडणं आणि मृत होत जाणं असे दुष्परिणाम आपल्याला दिसतात.
५.       कोरल मायनिंग- सामान्य खाणकामा सारखंच कोरल्स च सुद्धा खाणकाम केलं जातं. खूप जुन्या आणि विशेष कोरल्स ना चांगला भाव मिळतो. मात्र वाढत्या मागणीमुळे कोरल्स ची पीछेहाट वाढते.


प्रवाळ बेटं ही सुद्धा आपल्याला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे. त्यांच्या संगोपनासाठी आणि वाढीसाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने होणारे अध्ययन हे एक योग्य पावूलच म्हणावं लागेल. असचं संशोधन अडस बँक आणि इतर लहान सहान विखुरलेल्या प्रवाळ खोऱ्यामध्ये होणं जास्त गरजेच आहे. त्यामुळे आपल्याला तेथे असणाऱ्या जैवविविधतेच अनुमान येईल आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतील.

पुढील लेखात- इंग्लंडमध्ये चालू असणाऱ्या जैवविविधतेच्या संरक्षणाबद्दल आणि त्यातून भारताला घेता येणाऱ्या धड्यांबाद्द्ल.

No comments:

Post a Comment